पुण्यामध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीला बळजबरीने दारू पाजून लैंगिक अत्याचार

एका अल्पवयीन १३ वर्षीय शाळकरी मुलीस बळजबरीने दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या मित्रांसह एका मैत्रिणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार याबाबत अल्पवयीन आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३७६, ३२८, ५०६, ३४, पोक्सो ४,८,१२ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि एका मुलाची मागील काही दिवसांपासून ओळख निर्माण झाली होती. त्याने मुलीला वेगवेगळे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मुलीच्या आरोपी अल्पवयीन मैत्रिणीने पीडित मुलीस फूस लावून एका मित्राच्या घरी रिक्षाने नेले. त्या ठिकाणी तिला बळजबरीने दारू पाजली गेली. त्यानंतर दारूच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. मित्राबरोबर असलेल्या एकाने या वेळी मुलीचे मोबाइलवर छायाचित्रे काढल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रारीत सांगितले आहे. पोलिस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड याबाबत पुढील तपास करत आहेत.