डोंबिवलीच्या कोपररोड भागात २ मजली इमारत जमीनदोस्त   

कल्याण :
कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, आज पहाटे डोंबिवलीच्या कोपररोड भागात २ मजली धोकादायक इमारतीचा भलामोठा भाग कोसळलाय. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीतील लोकांचा अगदी थोडक्यात जीव बचावला.
कोपरमधील भागात मुख्य रस्त्याला लागून ही ४२ वर्षे जुनी इमारत आहे. लोडबेअरिंग पद्धतीने बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये साधारण १४ कुटुंब राहत होते.
मोठी जीवितहानी टळली अन्यथा याठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती. तर रात्रीपासूनच या इमारतीमध्ये माती कोसळण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी याठिकाणी दाखल झाले असून इमारतीचा उर्वरित भागही पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी यांच्या कार्याची आजच्या तरुण पिढीला ओळख होण्याची गरज – दीप चव्हाण 

नगर : स्व. इंदिरा गांधी या कर्तुत्वान महिला होत्या. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळाला. इंदिराजींच्या कार्याची आजच्या तरुण पिढीला ओळख होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी महापौर दीप चव्हाण यांनी केले आहे.
इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे होते.
प्रदेश काँग्रेसच्या आदेशाप्रमाणे त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकरी अधिकार दिन यानिमित्ताने पाळण्यात आला. त्याचबरोबर कामगार, शेतकरी कायद्यांच्या विरोधामध्ये सत्याग्रहाची भूमिका यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर वक्त्यांनी ठेवली.
यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, ज्येष्ठ उद्योजक अशोकराव कानडे, ॲड. माणिकराव मोरे, निजामभाई जहागीरदार, डॉ. प्रा.बापू चंदनशिवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.चंदनशिवे यावेळी बोलताना म्हणाले की, इंदिरा गांधींनी या देशाला अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी दिल्या. त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा देशावर सकारात्मक दूरगामी परिणाम राहिलेला आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण करून त्यांनी या देशाची आर्थिक घडी मजबूत केली होती. मात्र आत्ताचे आरएसएस प्रणित जातीयवादी मोदी सरकार याच बँकांचे खाजगीकरण करण्याच्या मागे लागले आहे हे या देशाचे दुर्दैव आहे.
डॉ. चंदनशिवे पुढे म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल हे लोहपुरुष होते. स्वातंत्र्यानंतर देखील या देशाच्या एकीकरणाची प्रक्रिया यशस्वीरित्या घडवण्यामध्ये पटेलांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. शेतकरी, कामगार विरोधी कायदे हाणून पाडण्यासाठी महात्मा गांधींच्या शिकवणीप्रमाणे सत्याग्रहाची काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही मोदी सरकारला झुकण्यासाठी भाग पाडेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले. ज्ञानदेव वाफारे, अशोकराव कानडे आदींची यावेळी भाषणे झाली. यावेळी अनिस चुडीवाल, इम्रानभाई बागबान, प्रवीण गीते, विशाल कळमकर, अमित भांड, प्रमोद अबुज, मुबिन शेख, अन्वर सय्यद, प्रशांत जाधव, संजय भिंगारदिवे, अजय मिसाळ, शंकर आव्हाड, समीर बागबान, दत्ता साबळे, अक्षय जाधव, भूषण ससाने, आदित्य यादव, संकेत लोकरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
https://youtu.be/dMP8k1UQ6zQ