अहमदनगर :

 सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार, कथा, पटकथा, संवाद लेखक व कवी बाबासाहेब सौदागर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या खानदेश विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार व खा. सुप्रिया ताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्हॉट्स अँप व ईमेलद्वारे बाबासाहेब सौदागर यांना नियुक्तीपत्र पाठविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, स्वाभिमानी विचार, व पक्षाची प्रतिमा तळागाळातील  जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणावर वाढवावे व पक्ष मजबूत करण्याकामी योगदान द्यावे असे या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

 

 

 

 

 

कवी बाबासाहेब सौदागर हे मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम चित्रपट गीतकार, कथा, पटकथा, संवाद लेखक व चरित्र अभिनेते आहेत. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून त्यांनी ७८ मराठी चित्रपट, २८ मालिकांसाठी गीत लेखन केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ३५० हुन अधिक पारितोषिके मिळाले असून त्यांच्या ५०० हुन अधिक गीतांच्या ध्वनी मुद्रिका प्रसारित झाल्या आहेत. तर अनेक चित्रपटातून त्यांनी विविध रंगी चरित्र भूमिका देखील साकारल्या आहेत. सत्ताधीश, झुंजार, सवत, झुंज, एकाकी, सासरची का माहेरची, धरणी आईची माया, नातं मामा भाचीचं, लग्नाची वरात लंडनच्या घरात, चंद्रभागा, मी सिंधुताई सपकाळ, सासर माझं दैवत, हळद तुझी कुंकू माझं, उमंग, राजमाता जिजाऊ, अंतदाह हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. तर आशा अभिलाषा, इन मिन साडेतीन, ऋणानुबंध, चिमणी पाखरं, बंदीशाळा, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, क्रांतिसिंह नाना पाटील, शिवार गप्पा या मालिकांसाठी त्यांनी गीत लेखन केले आहे.  त्यांचे ‘सांजगंध’ व ‘पिवळण’ हे कवितासंग्रह ‘चित्ररंग’ हा चित्रपट गीत संग्रह, ‘भंडारभुल’ हा कथासंग्रह व ‘पायपोळ’ हे आत्मचरित्र प्रकाशित असून आकाशवाणी व दुरदर्शन वरून त्यांच्या कवितांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. त्यांच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी वरील ‘दुसरी बाजू’  या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी घेतलेली त्यांची मुलाखत देखील प्रसारित झाली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्याम शिंदे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनिल गोसावी, शर्मिला गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, खजिनदार भगवान राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.