तो मी नव्हेच चा श्रीगोंदा तालुक्यात रंगतोय नवा प्रयोग
तोतया नववधू द्वारा लखोबाची फसवणूक
सध्या व्यापारी, अधिकारी, जमीनदार, शिक्षक अशी वेगवेगळी रूप घेऊन उच्चभ्रू महिलांशी लग्न करून नंतर त्यांना सोडून पळ काढणाऱ्या लोकोबा लोखंडे या पात्रावर आचार्य अत्रे यांनी तो मी नव्हेच हे नाटक लिहिले होते. तालुक्यात मागील काही महिन्यांपासून अशाच घटना घडत आहे. फरक एवढाच आहे की, यात फसवलेले गेलेले पात्र हे लखोबा नसून लाखोबा आहेत. तोतया नववधू बनून अनेक तरुणांना तो मी नव्हेच नी गंडवलेले आहे. लग्न करून ऐवजासह पलायन करणाऱ्या तोतया नववधू व फसलेले लाखोबा तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. नववधूने सासू-सासर्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे घटना मागील आठवड्यात न्यायालयाच्या आवारात घडली. या घटनेमुळे लग्नाच्या नावाखाली होणारे फसवणुकीचे प्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत. ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाची परिस्थिती गंभीर झाली आहे. ग्रामीण भागातील मुली शिक्षणात भरारी घेत आहे. त्यामुळे वधूपित्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून साधारणतः मुलाला नोकरी सोबत शेतीही असावी, अशी वधू पित्याची अपेक्षा असते. ग्रामीण मुलांची स्थिती उलट असून त्यांच्याबरोबर बेरोजगारी, घटत चाललेली शेती अशा समस्या आहे. त्यामुळे स्वतःहून लग्न करून घेण्यावर वर बापाचा जोर दिसत आहे. स्वतःहून लग्न करून घ्यायला तयार असूनही आसपासच्या नात्यागोत्यात लग्न न जमल्यास दलालांच्या मदतीने विदर्भ आणि मराठवाड्यातून सुनबाई आणल्या जात आहे. याच प्रकरणांमध्ये फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहे.बाहेरून नवरी शोधण्यासाठी दलाल वर बापाकडून लाखो रुपयांचे रकमा उकळतात. नवरी गुण्यागोविंदाने नांदली तर ठीक अन्यथा, दलालांच्या मदतीने झालेल्या लग्नानंतर नववधू काही दिवसातच सोन्याच्या दागिन्यांसह पसार झाल्याच्या घटना काही नवीन नाहीत. लग्नानंतर काही दिवसात नवरी परस्पर पसार झाल्याची ही काही प्रकरणे आहे. अशा घटनांमध्ये दलाल आणि उकळलेली रक्कम आणि नवरीने पळवलेले दागिने असे लाखो रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ अनेकांवर आली आहे. याशिवाय मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. मानहानी वेगळीच. लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने बहुतेक जण पोलिसांपर्यंत जाण्यास धजावत नसल्याने याचे चांगलेच फावते आहे.