नवी दिल्ली, ता.२ : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामकरण करण्याच्या, निर्णयाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता.२) फेटाळली. राज्यांना त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार असल्यामुळे आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय आणि न्यायमूर्ती एस.व्ही.एन. भाटी यांच्या खंडपीठाने सांगितले आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे व महसूल विभागांचे क्रमशः छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरविला होता. त्यानंतर शेख मसूद इस्माइल शेख तसेच अन्य काहीजणांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. विविध भागात राहणाऱ्या लोकांची त्या भागाच्या नावाबाबत सहमती किंवा असहमती असू शकते. तसेच नाव ठेवण्याचा अधिकार सरकारला आहे, तर नाव बदलण्याचा अधिकार देखील सरकारला आहे. अशी टिप्पणी खंडपीठाने केली.
Prev Post