राजकीय नेते घरोघरी, मतदारांची पर्यटनवारी
अहिल्यानगर : रविवारचा मुहुर्त साधून मतदार बाहेरगावी गेले. अनेकजण अजुनही दिवाळी सुटीच्या मूडमध्ये आहेत. एकीकडे उमेदवार घरोघरी जात आहेत, तर मतदार बाहेरगावी गेल्याचे दिसून आले. उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांनी रविवारी मात्र चांगलाच गाजवला. अहिल्यानगर शहरातील अनेक कुटुंब दिवाळी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळी फिरून सहलीचा आनंद घेत आहेत. ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेतीचे कामामध्ये व्यस्त आहेत. उमेदवार प्रचारासाठी जात आहेत, कॉलनीमधील अनेक घरांना कुलूप दिसत आहे. दिवाळीमध्ये शाळा, व्यावसायिक संस्थांना सुट्या असल्याने अनेक कुटुंबे पर्यटनाचे नियोजन करतात. राज्यभरातील धार्मिकस्थळे या काळात पर्यटकांनी फुललेली पाहायला मिळतात. यंदा ऐन दिवाळीत निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. दिवाळी संपताच निवडणूक प्रचाराच्या फेऱ्या सुरू झाल्या. सुट्यांवर गेलेले मतदार ११ नोव्हेंबरनंतरच घरी परतणार आहेत. त्यानंतर १८ नोव्हेंबरला जाहीर प्रचार थांबेल. त्यामुळे या मतदारांना गाठण्यासाठी ११ ते १८ नोव्हेंबर हा आठवडांभराचाच कालावधी उमेदवारांना मिळणार आहे.