झेंडीगेट भागात कत्तलखान्यावर छापा : ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी पुन्हा एकदा झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यावर छापा टाकला. या कारवाईत तिघा जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलिसांनी एका पत्र्याच्या शेडमधून गोमांस व इतर साहित्य, असा एकूण ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. झेंडीगेटमध्ये अवैध कत्तलखाना सुरु असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार संदीप पवार, पंकज व्यवहारे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, रविंद्र घुंगासे, आदींचे पथक तयार करुन कारवाईस रवाना झाले. फैजान इद्रिस कुरेशी व इतर इसमांनी बाबा बंगाली चौकीजवळील सरकारी शौचालयाचे शेजारी एका पत्र्याचे शेडमध्ये गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवलेले आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. पोलिस खात्री करण्यासाठी जात असताना ३ इसम पळून गेले. पत्र्याचे शेडमध्ये पाहणी केली असता गोवंश जातीची जिवंत जनावरे निर्दयतेने बांधुन ठेवलेली मिळून आली. आसपासचे नागरिकांना विचारपूस करून पळून गेलेल्या इसमांचे नाव विचारले असता त्यांची नावे फैजान इद्रिस ‘कुरेशी, सुफियान उर्फ गुल्लु इद्रिस कुरेशी, शोएब अब्दुलरऊफ कुरेशी (सर्व रा. झेंडीगेट, अहिल्यानगर) असल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथून १५ गायी, ३ लहान गोवंशीय गोहे असे एकूण १८ जिवंत गोवंशी जनावरे ताब्यात घेतली. तिन्ही फरार आरोपीविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचे कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस स्टेशन करीत आहे.