थंडीत घट; पुढील तीन दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा!

ढगाळ वातावरणाने तापमान १० अंशांनी वाढले

अहिल्यानगर : शहराचे तापमान आठवड्यांपूर्वी 4.4 तीन अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले होते. त्यानंतर मात्र ९ डिसेंबरपासून तापमानात वाढ होत गेली. गुरुवारी (२६ डिसेंबर) शहराचे तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने थंडीत काही अंशी घट झाली आहे. दरम्यान, २७ व २९ डिसेंबरला जिल्ह्यात विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट व मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तीन आठवड्यात १० अंशानी तापमान वाढले. गेल्या २५ दिवसांत तापमानात मोठे बदल झाले आहेत. ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ व अवकाळी पावसाने थंडीचे प्रमाण कमी झाले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा थंडीत वाढ ‘होऊ लागली होती. १ डिसेंबरला शहराचे किमान तापमान ६.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. २ डिसेंबरला ५.५ इतके नीचांकी नोंदवण्यात आले. ३ डिसेंबरला ५.५ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले. ४ डिसेंबरला ७.४, ५ डिसेंबरला ७.५ अंश, तर ६ डिसेंबरला ९.७ अंश सेल्सिअस तापमान होते. ६ डिसेंबरपासून तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली. ७ डिसेंबरला थेट ७ अंशांनी तापमान वाढून १३ अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यानंतरही सातत्याने तापमानात वाढ होत होती. २६ डिसेंबरला १५. अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे गेल्या तीन आठवड्याच्या तुलनेत थंडीचा कडाका काहीसा कमी झाला होता. दरम्यान, गुरुवारी शहर व परिसरात काहीसे ढगाळ वातावरण होते.

◆ प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

जिल्ह्यात २६ व २९ डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा, तर २७ आणि २९ डिसेंबरला वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.