सर्पमित्राला पैसे द्यायचे का ?
रेस्क्यू करणे बंधनकारक; पैसे देणे ऐच्छिक बाब, वनविभागाला त्याची माहिती कळवणे बंधनकारक
अहिल्यानगर : घरामध्ये अथवा अपार्टमेंटच्या आवारात साप नजरेस पडला तर नागरिकांकडून त्वरित सर्पमित्रांची मदत घेतली जाते. अनेकदा नागरिक स्वखुशीने सर्पमित्रांना काही पैसे माणुसकी म्हणून बक्षीस देतात तर काही वेळा अपवाद वगळता सर्पमित्र स्वतःहून देखील पैशांची मागणी करतात, अशावेळी पैसे देणे किंवा नाही देणे हा त्या नागरिकाची ऐच्छिक बाब आहे, असे वनविभागाचे म्हणणे आहे.
वनविभागाशी या नंबरवर साधा संपर्क :
घरामध्ये किंवा अपार्टमेंटच्या वाहनतळात साप दिसल्यास वनविभागाची मदत घेण्यासाठी नागरिकांनी १९२६ या टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधावा. वनरक्षक, वनपाल किंवा वनमजूर यांचा आल्यानंतर संबंधित भागात असलेल्या सर्पमित्रांना सूचना देऊन साप पकडण्याची किंवा तो वन्यप्राणी पकडण्याबाबत योग्य कारवाई करता येते.
अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक :
१. साप हा नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे; मात्र सापाविषयीच्या अंधश्रद्धा आणि गैरसमज समाजात मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत.
२. यामुळे सापाविषयीची भीती अधिक असल्याचे दिसून येते. भारतात २७५ हून जास्त साप आढळतात.