महिलांना लवकरचं पिंक ई-रिक्षाचा मिळणार लाभ !
अहिल्यानगर : जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अधिकाधिक गरजू व पात्र महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचा लाभ देण्यात यावा. आपला जिल्हा या योजनेमध्ये अग्रेसर राहील, यादृष्टीने योजनेची अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पिंक ई-रिक्षा योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे संजय गर्ने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, महिलांना, मुलींना रोजगार निर्मितीस चालना देऊन, सुरक्षित प्रवास करण्यासाठी ही योजना लाभदायी आहे. पिंक ई- रिक्षांचा लाभ घेतल्यानंतर महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. शासनाकडून ई-रिक्षांच्या एकूण किंमतीवर सर्व करांसह २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ७० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असून, उर्वरित १० टक्के रक्कम संबंधित महिलेला लाभार्थी हिस्सा म्हणून गुंतवावी लागणार आहे.