रक्तदात्यास पीसीव्ही, प्लाझ्मा विनामूल्य!
महानगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये आवश्यक रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. सर्व रुग्णालयांतील गरजू रुग्णांना लाल रक्तपेशी (पीसीव्ही) व प्लाझ्मा (एफएफपी) सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रक्तदाता असल्यास पीसीव्ही व प्लाझ्मा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेली ही रक्तपेढी सर्व आवश्यक साधनसामग्रीसह कार्यरत आहे. आवश्यक स्टाफही उपलब्ध आहे.
महानगरपालिका विविध स्वयंसेवी संस्था सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वेळोवेळी रक्तदान शिबिर घेत आहे. या माध्यमातून रक्तपेढीमध्ये आवश्यक व मुबलक प्रमाणात रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. सर्व रुग्णालयातील गरजू रुग्णांना पीसीव्ही ५५० रुपयांत, तर प्लाझ्मा १५० रुपयांत उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे रक्तदाता उपलब्ध आहे, त्यांना पीसीव्ही व प्लाझ्मा विनामूल्य उपलब्ध आहे. शहरातील गरजू रुग्णांना या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
रक्ताची गरज असणाऱ्या गरजू रुग्णांच्या नातेवाईकांनी रक्तपेढी प्रमुख डॉ. शंकर शेडाळे (मो. ९३७२८७९३९३) यांच्याशी अथवा महानगरपालिका रक्तपेढी, कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल, दुसरा मजला, आशा चौक, अहिल्यानगर येथे ०२४१-२३४५६४६ या क्रमांकावर संपर्क साधावा. दरम्यान, शहरातील इच्छुक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना व इतर संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिर घेण्यासाठी जनसंपर्क अधिकारी संतोष काळे (मो. ८६०५६६२७९२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिकेकडून करण्यात आले आहे.