Swami Vivekananda’s work is inspiring for the youth
युवा दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने विवेकानंदांना अभिवादन
नगर :
स्वामी विवेकानंदांनी जगाच्या पातळीवरती भारतीय संस्कृतीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांचे विचार करोडो युवकांसाठी आजही प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
स्वामी विवेकानंद जयंती निमित्त काँग्रेसच्यावतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी चिरंजीव गाढवे, सुजित जगताप, ॲड.अक्षय कुलट,नलिनीताई गायकवाड, अनंतराव गारदे, अनिसभाई चुडीवाल, नाथा अल्हाट, सुनीता बागडे, प्रशांत जाधव, उषाकिरण चव्हाण, नीता बर्वे, कौसर खान, जरिणा पठाण, प्रमोद अबुज, अमित भांड, प्रवीण गीते, शंकर आव्हाड, सिद्धेश्वर झेंडे, प्रसाद शिंदे, ॲड.चेतन रोहोकले आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना काळे म्हणाले की, स्वामी विवेकानंदांनी वैश्विक बंधुत्वाच्या विचाराला जगभरात पोहोचविण्याचे काम केले. त्यांनी मांडलेला आत्मजागृतीचा विचार आजही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या विचारांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे.
स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर मानवजातीसाठी मदत कार्य केले. ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये त्यांनी राष्ट्रवादाला अध्यात्माशी जोडण्याचे काम केले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संबंध भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन पाळला जातो. स्वामी विवेकानंदांच्या विचारांना अनुसरून आजच्या युवा पिढीने राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान देण्याचे आवाहन, यावेळी काळे यांनी केले.