विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नगर शहराला स्मार्ट सिटी करण्याचे धडे

स्मार्ट सिटीत काय हवे, याची झाली चर्चा 

नगर :
           दिवस जिजाऊ जयंतीचा. विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे योगायोगाने अहमदनगर वस्तुसंग्रहालयातील जिजाऊंच्या जयंती निमित्ताने एकत्र आले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना विद्यार्थी काँग्रेसच्या युवा सहकाऱ्यांना आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा असल्याचे सांगितले आणि तेथेच जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्मार्ट सिटीचे धडे द्यायला सुरुवात केली.

अनपेक्षितणे घडलेल्या या संवादामुळे विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आनंदून गेले. विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, सुजीत जगताप, प्रशांत जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, प्रवीण गीते, प्रमोद अबूज, अमित भांड, शंकर आव्हाड, सिद्धेश्वर झेंडे आदिंसह विद्यार्थी, तरुणांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना नगर शहराच्या विकासाबाबत आपल्या कल्पना मांडल्या.   

त्या ऐकून घेत असताना नगर शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी नेमके काय करायला पाहिजे याचे मार्गदर्शन जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केले. हा संवाद तब्बल पंचवीस मिनिटे चालला.  यावेळी स्मार्ट सिटीतील स्मार्ट या इंग्रजी शब्दाची फोड करून सांगताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, एसच्या (सस्टेनेबल ग्रोथ) माध्यमातून शहराचा शाश्वत विकास होण्याची गरज असते. एम (मोटोरेबल रोड) म्हणजे शहरामध्ये दळणवळणासाठी वाहतुकीचे मार्ग चांगले असण्याची गरज असते.

एच्या (अफॉरडेबल हाऊसिंग) माध्यमातून शहरामधील सर्व  आर्थिकस्तरातील घटकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध होऊ शकली पाहिजेत. आरच्या (रियल टाईम रिस्पॉन्स) माध्यमातून शहरातील नागरी सुविधा नागरिकांना तातडीने उपलब्ध होण्याची यंत्रणा असली पाहिजे. टीच्या (ट्रेड फ्रेंडली) माध्यमातून उद्योगाला चालना मिळत रोजगाराची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या मार्गदर्शनाने भारावून गेलेल्या विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही शहराच्या विकास कार्यात सर्वतोपरी सहभागी असू असे आश्वासन दिले आणि त्यानंतर जिल्हाधिकारी आपल्या कार्यालयाकडे रवाना झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते भारावून गेले होते. यावेळी अनंतराव गारदे, महिला काँग्रेसच्या नलिनीताई गायकवाड, उषाकिरण चव्हाण, सुनीताताई बागडे, कौसर खान, नीता बर्वे, जरीना पठाण आदी उपस्थित होत्या.