शहरात ऑक्सिजन उपलब्ध करुन, श्रेय घेण्याचे राजकारण थांबवण्याचे आवाहन अजीम राजे
जास्तीचे बील आकारुन लुट करणार्या हॉस्पिटलवर कारवाईसाठी समाजवादीचा पुढाकार
अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या दुसर्या लाटेत आरोग्य व्यवस्थेत अनागोंदी निर्माण होऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर अनेक कोरोना रुग्णांना बेड मिळण्यास तयार नाही. या अनागोंदीमध्ये प्रशासन देखील आपली जबाबदारी पार पडताना दिसत नसल्याचा आरोप समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. अशा संकटकाळात सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन सर्वसामान्यांच्या जिवाचा विचार करुन एकत्र येण्याचे आवाहन समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केले आहे. तर जास्तीचे बील आका लुट करणार्या हॉस्पिटलवर कारवाई होण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये विविध राजकीय पक्ष राजकारण करताना दिसत आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, त्यांचे नातेवाईकांची पळापळ सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी एकत्र आल्यास या संकटकाळात निर्माण झालेल्या समस्या दूर करता येणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी परिस्थितीचे भान ठेऊन व गांभीर्य ओळखून सर्वसामान्यांच्या मदतीसाठी उभे राहण्याची गरज असल्याचे समाजवादी पार्टीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा असून, रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सर्रास सुरु आहे. हॉस्पिटलच्या वाढीव बिलामुळे कोरोना रुग्णांचे नातेवाईक चिंतेत असून, त्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. समाजवादी पार्टीने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने ठरवून दिलेले दर खासगी हॉस्पिटलने आकारण्यासाठी जबाबदारी स्विकारली आहे. जास्तीचे बिल आकारणार्या हॉस्पिटलवर कारवाई करुन त्यांची मान्यता रद्द करण्यासाठी समाजवादी पाठपुरावा करणार आहे. तर वेळप्रसंगी न्यायालयात देखील दाद मागणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी दिली. समाजवादी पार्टीच्या वतीने 8208150011 हा मोबाईल क्रमांक हेल्पलाईन नंबर म्हणून देण्यात आला आहे. ज्या कोरोना रुग्णांची जास्तीचे बिले आकारण्यात आली आहे. त्यांच्या नातेवाईकांनी या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.