धर्म रक्षक अनिलभैय्या राठोड कोविड सेंटरला १०० नेब्युलायझरची प्रेरणा एन्टरप्रायजेस चे अतुल डावरे यांच्याकडून मदत

अहमदनगर (प्रतिनिधी): शिवसेनेच्या धर्म रक्षक अनिल भैय्या राठोड कोविड सेंटरला प्रेरणा एन्टर प्रायजेसचे अतुल डावरे यांनी १०० नेब्युलायझर म्हणजेच वाफेच्या मशीनची भरीव  मदत केली आहे. शास्त्रीय उपकरणे आणि क्रीडा साहित्य पुरविणाऱ्या प्रेरणा एन्टरप्रायजेसन या सेंटर साठी नामाकीत कंपनीचे नेब्युलायझर उपलब्ध करून दिले आहेत.

     नगरचे मुख्य उपनगर असलेल्या केडगाव येथे शिवांजली मंगल कार्यालयात शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पुढाकाराने हे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरला हिंदू धर्मरक्षक अनिल भैय्या राठोड कोविड सेंटर असे नाव देण्यात आले आहे. सर सोयी सुविधांनी युक्त १०० बेडचे हे सेंटर आहे. नगर शहर शिवसेनेने अहमदनगर महानगर पालिकेच्या परवानगीने हे सेंटर सुरु केल्यामुळे केडगावकराना कोरोना आपत्तीच्या काळात मोठा आधार मिळाला आहे. या ठिकाणी आता ३० कोविड बाधित पण लक्षणे नसलेले रुग्ण उपचार घेत आहेत. अत्यंत हवेशीर वातारणात शिवांजली मंगल कार्यालयाच्या प्रशस्त परिसरात हे सेंटर अगदी थोडक्या कालावधीत तयार करण्यात आले .

शिवसेनेचे पदाधिकारी , नगरसेवक आणि शिवसैनिकांनी इथे तन मन धनाने हे सेंटर उभे केले या ठिकाणी दाखल रुग्णांना दोन वेळचे जेवण , चहा , नाष्टा आणि औषधोपचार मोफत देण्यात येतात . शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून दानशूर व्यक्ती या सेंटरला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.  अतुल डावरे यांनी दिलेल्या १०० वाफेच्या मशीनचा स्वीकार शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केला असून त्या भरीव मदतीबद्दल त्यांनी  शिवसेनेच्या वतीने डावरे यांचे आभार मानले. या सेन्टरवर हळू हळू दाखल रुग्णांची संख्या वाढत आहे.  पूर्ण क्षमतेने हे सेंटर सुरु झाल्यास सर्व सेवा मोफत देताना सेन्टरवर मोठा ताण येणार आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी सढळ हाताने शिवसेनेच्या या कोविड सेंटरला मदत करावी असे आवाहन सातपुते यांनी केले आहे.