मतदारांमध्ये परिवर्तनाचे सामर्थ्य -अ‍ॅड. अनिता दिघे

शाहिरीतून स्वच्छता व मतदार जागृती

अहमदनगर (संस्कृती  रासने )

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून हातात झाडू घेऊन देशाला महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. साथीचे आजार टाळण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. मतदारांमध्ये परिवर्तनाचे सामर्थ्य असून, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन आधारवड बहुद्देशीय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अ‍ॅड. अनिता दिघे यांनी केले.

 

शहरातील नगर-कल्याण रोड, नेप्ती नाका येथे अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य, आधारवड बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता व मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी अ‍ॅड. दिघे बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या संध्या पावसे, रजनी ताठे, नयना बनकर, वंदना थोरवे, आरती शिंदे, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, निकिता वाकचौरे, मंगल सोनवणे, शाहीर कान्हू सुंबे, संतोष शेलार उपस्थित होते.

 

 

शाहीर वसंत डंबाळे व संध्या पावसे यांनी आपल्या शाहिरी गीतांमधून स्वच्छता व मतदानाचे महत्त्व सांगितले. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता तर सदृढ लोकशाहीसाठी मतदानाचे महत्त्व सांगणारे गीत पारंपारिक वाद्यांसह शाहिरांनी सादर केले. संध्या पावसे यांनी देशात पन्नास ते साठ टक्के होणारे मतदान अत्यल्प असून, ते शंभर टक्के होण्याची गरज आहे. मतदार जागृक झाल्यास लोकशाहीला महत्त्व प्राप्त होऊन योग्य उमेदवार निवडीने विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.