नगरमध्ये पहिल्याच दिंडीचे अर्बन बँक कॉलनीत स्वागत वारीला संतांनी भागवत भक्तीचे अधिष्ठान दिले आहे

नगर –  वारी ही भक्तीमार्ग न ठरता एक सामाजिक – धार्मिक चळवळ होत आहे. वारीत हजारो लोक वेगवेगळ्या गावांहून येतात. कोण कोठून आला, तो कोणत्या जातीचा, त्याची सामाजिक-आर्थिक परिस्थिती कशी आहे. हा विचार कोणालाच येत नसतो. वारीला संतांनी भागवत भक्तीचे अधिष्ठान दिले आहे, असे प्रतिपादन दिंडी चालक हभप माधवराव महाराज यांनी केले.

     नगरमध्ये प्रवेश करणार्‍या पहिल्याच मराठवाड्यातील श्रीक्षेत्र कन्हेरे येथील जिव्हेश्वर महादेव रथासह पायी दिंडीचे मोठ्या भक्तीमय, उत्साही वातावरणात अर्बन बँक कॉलनीत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दिंडी चालक हभप माधवराव महाराज पाटील, आनंदा भिमराव पाटील,माजी नगरसेवक निखिल वारे, माजी नगरसेविका संगीताताई खरमाळे, शहर अभियंता मनोज पारखे, शहाजी पांडूळे, प्रविण डोक्रस, विनय वाखूरे, सचिन गाडे, सचिन वारे, शरद देशपांडे, उषा निसळ आदिंसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     यावेळी जोशी परिवाराच्यावतीने रथातील महादेवांचे पूजन करुन महाराजांचा सन्मान केला. वारकर्‍यांना अल्पोहार, फळे, चहा वाटप करण्यात आले. आदिनाथ जोशी यांनी जिव्हेश्वर महादेव दिंडीचे महत्व विशद केले. अर्बन बँक कॉलनीमधील हौशी विठोबा मंदिरात ही दिंडी आली की, जिव्हेश्वर महादेव व विठूरायाची भेट म्हणजे हरिहरेश्वर भेट होऊन दर्शन होत असते.

     हभप माधव महाराज पुढे म्हणाले, महाराष्ट्रात वारी सांप्रदायात पंढरपुर वारीला अनन्यसाधारण महत्व असते. ‘जो ईश्वरापासून विभक्त नाही तो भक्त’ अशी सोपी व्याख्या संत करतात. वारीला आला तो वारकरी होतो. आपल्या कुटूंबाला सोडून  पांडूरंगाला भेटण्याची तळमळच या पायी चालणार्‍या वारकर्यांची वाट सोपी होत असते. वारीचा अवघड दिनक्रम खडतर प्रवास असतो. पण भजन, अभंग, गवळीणी आणि विठू माऊलीचे नामस्मरणामुळे कोणला त्याचा काहीच त्रास जाणवत नाही, असा दिंडीचा महिमा असतो.

     यावेळी अभिजित जोशी, प्रज्ञा जोशी, भार्गव जोशी यांचे हस्ते जिव्हेश्वर महादेवाची आरती करुन रथासह वारकर्‍याना पुढील प्रवासासाठी निरोप देण्यात आला. या वेळी विनय वाखुरें यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वारकर्‍यांना फळे वाटली. माधव महाराज यांनी विनय यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.दिंडीतील वारकरी सेवेसाठी कॉलनीतील सर्व रहिवासी यांनी सेवा दिली.