साई मिडासच्या प्रमाणपत्रात महापालिकेची हलगर्जी

मुख्यमंत्र्यांचे विधिमंडळात उत्तर

नगर शहरातील मनमाड रोडवर उभारण्यात आलेल्या साई मिडास इम्पेरियल टॉवर्सला भोगवटा प्रमाणपत्र देताना अहमदनगर महापालिकेतील सहाय्यक संचालक नगररचनाकार यांनी हलगर्जी केली असून याबाबत संबंधिताला शासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात बजावण्यात येणार असल्याचे उत्तर विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याबाबत आमदार बच्चू कडू यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, साई मिडास कंपनीच्या संचालकांनी 4 कोटी 72 लाख इतक्या रकमेच्या बनावट पावत्या व खोटे प्रमाणपत्र तयार करून महापालिकेकडे भरणा केल्याचे दाखवून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला असल्याचे मनपाच्या सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांनी तक्रारदार यांना दिलेल्या पत्रात मान्य केले असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब जर खरी असेल तर साईम मिडास कंपनीचे संचालक व संबंधित अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली आहे? असा प्रश्न आमदार कडू यांनी उपस्थित केला होता, यावर मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, साई मिडास इम्पेरियल टॉवर्सचे आर्किटेक यांनी भोगवटा प्रमाणपत्राचा ऑनलाईन प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला होता. त्यामध्ये सर्व शुल्क जमा केल्याचे नमूद करण्यात आले होते, मात्र शुल्क महापालिकेकडे जमा झाल्या बाबत खात्री न करताच अर्जदाराला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. याबाबत सय्यद गालिब, अली सय्यद यांनी केलेली तक्रार महापालिकेने निकाली काढली असून आयुक्तांनी सहाय्यक संचालक, नगररचना, जागा मालक, संबंधित आर्किटेक्ट मयूर कोठारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाईची तरतूद ठेवली आहे. हलगर्जी करणारे सहाय्यक संचालक, नगररचनाकार यांना शासन स्तरावरूनही कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही प्रस्तावित केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे