अहमदनगर ‘युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये’ राज्यात प्रथम!

अहमदनगर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा राज्यात अव्वल बनला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत विभागातर्फे जिल्ह्यातील १३२० उमेदवारांना ग्रामपंचायतीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, लाइफ स्किल ट्रेनिंग तसेच तांत्रिक प्रशिक्षणाद्वारे रोजगार क्षमता वाढविण्याचा शासनाचा निर्धार आहे.राज्यातील रोजगार इच्छुक किमान १८ व कमाल ३५ वर्षे वयोगटातील बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळून नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार, कौशल्याधारित नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाची शिफारस केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील १३२३ ग्रामपंचायतींमध्ये १३४३ रोजगार इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्यांपैकी १३२० उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.