माणुसकीच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी भाग्य लाभते -डॉ. वसंत कटारिया

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालकांची मोफत आरोग्य तपासणी

नगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकांना आरोग्यसेवा देण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. उत्तमप्रकारे आरोग्य सेवा देऊन या आरोग्य मंदिरात माणुसकीचे कार्य घडत आहे. नफा नसला तरी चालेल, मात्र सर्वांचे आरोग्य जपण्याचे कार्य या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु आहे. हृदयासंबंधी हजारो शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण करण्यात आल्या. या सेवा कार्यातून समाजात मोठा मान-सन्मान मिळाला. तर या सेवा कार्यात माझी मुले देखील जोडली गेली. माणुसकीच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी भाग्य लाभत असल्याचे प्रतिपादन डॉ. वसंत कटारिया यांनी केले.
जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये श्रीमती रिमलबाई शांतीलालजी कटारिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कटारिया परिवाराच्या वतीने आयोजित बालरोग मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. कटारिया बोलत होते. याप्रसंगी बाबालाल कटारिया, संजय कटारिया, ॲड. संतोष गुगळे, सुरेश गुगळे, लताताई कटारिया, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. प्रतीक कटारिया, हर्षदा कटारिया, प्रज्ञा कटारिया, डॉ. श्रेयस सुरपुरे, डॉ. रुपेश सिकची, डॉ. सोनाली कणसे, डॉ. वैभवी वंजारे, डॉ. कोमल लड्डा, संतोष बोथरा, निखिलेंद्र लोढा, सतीश लोढा, अभय गुगळे, माणकचंद कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर अद्यावत इन्फ्रास्ट्रक्चर नसताना देखील डॉ. वसंत कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हजारोंच्या संख्येने शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. आज जागतिक दर्जाच्या अद्यावत सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्या असून, मोठ्या प्रमाणात हृदयासंबंधी तसेच 6 हजार बालकांचे वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. हॉस्पिटलच्या स्थापनेपासूनच कटारिया व गुगळे परिवाराचे मोठे योगदान राहिले आहे. वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीसाठी गुगळे परिवाराचे आर्थिक सहकार्य मिळाले, तर त्यांनी नाममात्र दरात जागा उपलब्ध करून दिली. 25 एकर मध्ये शैक्षणिक संकुल उभे राहत आहे. सामाजिक कार्यात कटारिया व गुगळे परिवाराचे मोठे योगदान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. संतोष गुगळे यांनी मोठ्या शहराच्या धर्तीवर शहरातील बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी सुसज्ज बालकांचे एनआयसीयू सेंटर व नागरिकांना मिळणाऱ्या दर्जेदार आरोग्य सेवेचे कौतुक केले. बालरोग विभागात जन्मल्या पासून ते सर्व बालकांच्या आरोग्याच्या सेवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. तर बालकांवरील विविध अवघड शस्त्रक्रिया देखील यशस्वी केल्या जात असल्याची माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली.
या शिबिरात 110 बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. दर शनिवारी मोफत ओपीडी सेवा दिली जात असून, दर महिन्याला होणाऱ्या बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.