‘आनंदऋषीजी’ हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिरात ११० बालकांची मोफत तपासणी
अहिल्यानगर : आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये श्रीमती रिमलबाई कटारिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कटारिया परिवारातर्फे आयोजित बालरोग मोफत तपासणी शिबिरात ११० बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन डॉ. वसंत कटारिया यांनी केले. याप्रसंगी बाबालाल कटारिया, संजय कटारिया, ॲड. संतोष गुगळे, सुरेश गुगळे, लताताई कटारिया, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. प्रतीक कटारिया, डॉ. सोनाली कणसे आदी उपस्थित होते. डॉ. कटारिया म्हणाले, आर्थिक दुर्बल घटकांना आरोग्यसेवा देण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. उत्तमप्रकारे आरोग्य सेवा देऊन या आरोग्य मंदिरात माणुसकीचे कार्य घडत आहे. नफा नसला तरी चालेल, मात्र सर्वांचे आरोग्य जपण्याचे कार्य या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु आहे. हृदयासंबंधी हजारो शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण करण्यात आल्या. या सेवा कार्यातून समाजात मोठा मान-सन्मान मिळाला. तर या सेवा कार्यात माझी मुले देखील जोडली गेली. माणुसकीच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी भाग्य लाभत आहे. प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर अद्यावत इन्फ्रास्ट्रक्चर नसतानाही डॉ. वसंत कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हजारोंच्या संख्येने शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. ॲड. संतोष गुगळे यांनी मोठ्या शहराच्या धर्तीवर शहरातील बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी सुसज्ज बालकांचे एनआयसीयू सेंटर व नागरिकांना मिळणाऱ्या दर्जेदार आरोग्य सेवेचे कौतुक केले. बालरोग विभागात जन्मल्या पासून ते सर्व बालकांच्या आरोग्याच्या सेवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. तर बालकांवरील विविध अवघड शस्त्रक्रिया देखील यशस्वी केल्या जात असल्याची माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली.