विविध क्षेत्रातील कामगारांचे प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने आयटकचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर धरणे

मंजूर व रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्याची मागणी

विविध क्षेत्रातील कामगारांचे प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने आयटक संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर धरणे आंदोलन करुन अधिकार्‍यांना जाब विचारण्यात आला.  या आंदोलनात कामगार नेते अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. बाबा आरगडे, अवतार मेहेर बाबा युनियनचे सतीश पवार, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे श्याम पटारे, युवराज मोरे आदी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात ग्रामपंचायत, पतसंस्था आदी विविध क्षेत्रातील कर्मचारींचे राहणीमान भत्ता, किमान वेतनचे दावे प्रलंबित आहेत. सदर प्रश्‍न सोडविण्यात आलेले नाही. कोरोनाच्या नावाखाली या कार्यालयाचे कामकाज पुर्णत: ठप्प झाले असून, कामगार न्यायच्या प्रतिक्षेत आहेत. कार्यालयात एकूण 32 जागा मंजूर असून, केवळ 7 कर्मचारींवर कार्यालयाचे कामकाज चालवले जात आहे. यामुळे कामगार वर्गाचे प्रश्‍न सुटत नसून त्यांच्यावर एकप्रकारे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडूनच अन्याय सुरु असल्याचा आरोप आयटकच्या वतीने करण्यात आला आहे.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

कोरोना काळात अनेकांना कामा वरुन कमी केल्याचे अनेक दावे प्रलंबित आहे. वांबोरी (ता. राहुरी) या ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या तीन वर्षसपूर्वी राहणीमान भत्त्याच्या प्रश्‍नावर 44 कर्मचार्‍यांचे कोरोनापुर्वी दावा दाखल आहे. या प्रकरणात तारखा नाही, निकाल नाही. अशा बेजबाबदारपणामुळे कामगारांचे नुकसान होत असल्याचे अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी म्हंटले आहे. कॉ. बाबा आरगडे यांनी कामगार हितासाठी शासनाने कार्यान्वीत केलेले सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आपली जबाबदारी पार न पाडता कामगारांच्या मुळावर उठले आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाले असून, कामगारांचे प्रलंबीत प्रकरणे निकाली काढल्यास त्यांना न्याय मिळू शकणार आहे. हमाल, माथाडींचे अनेक प्रश्‍न प्रलंबीत असून, त्वरीत कार्यालयाकडून कामकाज सुरु होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच आयटक संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील मंजूर व रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्याची मागणी करण्यात आली.