जामखेड पंचायत समितीत वंचित चे भजन-कीर्तन आंदोलन.

आंदोलनात मा. मंत्री महादेव जानकरांची उडी.

            जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भटके-विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पंचायत समिती कार्यालयात अनोख्या पद्धतीने भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले.

 

 

 

 

 

 

                 खर्डा व जामखेड येथील मदारी समाज बांधव, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, वंचित बहुजन आघाडी चे जामखेड तालुका अध्यक्ष अतिश पारवे, ह. भ. प. बाबासाहेब गाडे, ह.भ.प. राजेंद्र महाराज झेंडे, मृदंगाचार्य भीमराव वाघ, मदारी समाजाचे प्रतिनिधी सलीम मदारी, सिकंदर मदारी, मेहबूब मदारी, फकीर मदारी, रहीम मदारी, हुसेन मदारी, अस्लम मदारी व इतर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
मदारी वसाहतीच्या बांधकामास कमी पडत असलेली १६ लाख रुपये रक्कम मी माझ्या आमदार निधीतून देण्यास तयार आहे. तुम्ही त्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स लावून सदरचे काम विनाविलंब तात्काळ मार्गी लावा. तांत्रिक मुद्द्यावरून गोरगरीब जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा सल्ला माजी पशूसंवर्धन राज्य मंत्री महादेव जानकर यांनी जामखेड चे गट विकास अधिकारी परशुराम कोकणे यांना दिला.
                   महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबांच्या वसाहतीला 2018 मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली. 2019 या आर्थिक वर्षात सदर बांधकामासाठी 88 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर झाला. सदरचे काम तात्काळ सुरु करा असे आदेश सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांनी दिल्या आहेत. तसेच गरज पडल्यास बँकेत असलेले 88 लाख रुपयांचा व्याजाची रक्कम वापरण्यास परवानगी घेता येते ,असे असताना जामखेड चे गटविकास अधिकारी परशुराम कोकणी हे जाणीवपूर्वक गोरगरीब मदारी समाजाची अडवणूक करत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पंचायत समिती कार्यालयात मदारी समाज बांधव व वारकर्‍यांनी भजन-कीर्तन आंदोलन केले. लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, मदारी समाजाचे प्रतिनिधी सलीम मदारी, ह. भ.प. बाळासाहेब गाडे महाराज, ह. भ. प. राजेंद्र झेंडे महाराज यांनी त्यांचे मनोगत मांडले, वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे प्रतिनिधी आजिनाथ शिंदे, , आदिवासी समाजाच्या प्रतिनिधी लोचना काळे, शब्बीर काळे यांच्यासह मदारी समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते

 

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

 

 

 

                       आंदोलनामागील भूमिका स्पष्ट करताना अॅड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, पंचायती प्रशासन व गट विकास अधिकारी परशुराम कोकणी हे गेल्या दोन वर्षापासून केवळ कागदी घोडे नाचवून गोरगरीब मदारी समाज बांधवांना झुलवित ठेवण्याचे काम करीत आहेत. अशा निष्क्रिय अधिकारी व चांगल्या विकासकामात राजकारण आणणाऱ्या पुढाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो. बँकेत खाते उघडण्यासाठी एक महिना विलंब का केला ?  मदारी वसाहतीचे बांधकाम कधी सुरू करणार ? या प्रश्नावर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
                     माजी पशुसंवर्धन राज्य मंत्री महादेव जानकर यांनी या आंदोलनास पाठिंबा देत जामखेड पंचायत समितीमध्ये येऊन आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. तसेच गटविकास अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. तर आमदार रोहित पवार व सहाय्यक समाज कल्याण आयुक्त रामकिसन देवढे यांच्याशी भ्रमणध्वनीवर मार्ग काढण्याबाबत चर्चा केली. त्यावर या कामाच्या ई निविदा काढण्याच्या सूचना दिल्या असून येत्या २ महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू करू असे आश्वासन दिले.
                    नगर बीड रोड वरील पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर  ज्ञानोबा-तुकाराम यांच्या नावाचा जयघोष करीत टाळ, मदुंग, विना व भगव्या पताका हाती घेतलेले वारकरी भजनी मंडळासह मदारी समाज बांधव व वंचित बहुजन आघाडीने पंचायत समितीमधील गटविकास अधिकार्‍याचे दालन व सभागृहासमोरून पायी दिंडी काढली व सभागृहाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मदारी वसाहतीचे काम तात्काळ सुरू झालेला पाहिजे. गोर गरिबांना हक्काचे घरे मिळालीच पाहिजेत. उदासीन पुढारी व दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाच्या धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

 

 

 

 

 

                      या आंदोलनास अजिनाथ शिंदे, अंकुश पवार, विशाल जाधव, सनी जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सचिन भिंगारदिवे, वैजिनाथ केसकर, संतोष चव्हाण, राकेश साळवे, दिपक माळी, तुकाराम शिंदे, राजू शिंदे आदींनी परिश्रम घेतले.