बिबट निवारा केंद्राचा प्रस्ताव अजूनही पडूनच?
अहिल्यानगर : बिबट प्रभावित क्षेत्रात मागील काही वर्षांत हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या समस्येवर शाश्वत उपाय योजना अद्याप केलेली नाही. नेचर लव्हर्स क्लबने २०२१-२०२२ मध्ये मुख्यमंत्र्यांना अभ्यास अहवाल सादर केला होता. शासनाकडे तीन वर्षांपासून हा अहवाल धूळखात पडून आहे, असा आरोप नेचर्स लव्हर्स क्लबचे सचिव नितीन थोरात यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात थोरात यांनी म्हटले आहे की, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शाश्वत उपाययोजना आवश्यक आहेत. शासनाकडे तीन वर्षांपासून बिबट्या निवारा केंद्र प्रकल्पाचा प्रस्ताव धूळखात असून, शासनाला याप्रश्नी लक्ष द्यायला वेळ नाही. बिबट्याच्या हल्ल्यात संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावर बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे निर्देश वनविभागाला देण्यात आले. परंतु, बिबट्या पुन्हा नवीन एखाद्या नागरिकाची शिकार करणार हे निश्चित आहे. गेल्या सहा महिन्यांत लोणी व राहुरी येथे लहान मुलांची शिकार बिबट्याने केल्याच्या घटना घडल्या. शासनाकडे शाश्वत परिणामकारक योजना नाही, व शासन त्यावर काम करायला तयार नाही. प्राणीसंग्रहालय व बिबट निवारा केंद्राच्या माध्यमातून समस्येवर नियंत्रण मिळवता येईल, असेही नितीन थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.