नायजेरिया :
नायजेरियातील बोको हराम या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा नरसंहार सुरू केला आहे. तब्बल 110 शेतकऱ्यांची कट्टर इस्लामिक संस्था बोको हरामच्या सदस्यांनी निर्घृण हत्या केल्याची माहिती यूएनने दिली आहे. गळा चिरून या लोकांची बोको हरामच्या दहशतवाद्यांच्या सशस्त्र गटाने सार्वजनिकपणे हत्या केली आहे आणि त्यांच्या स्त्रियांनाही आपल्यासोबत घेऊन गेले आहे.
याबाबत माहिती देताना संयुक्त राष्ट्रांचे मानवतावादी समन्वयक एडवर्ड कल्लोन म्हणाले की, कमीतकमी 110 लोकांना बोको हरामने निर्घृणपणे ठार मारले. याव्यतिरिक्त, बरेच लोक जखमी झाले आहेत. त्याचबरोबर मृतांची संख्या सुरुवातीला 43 होती, जी नंतर वाढून 70 झाली. शेवटी 110 लोकांची हत्या झाल्याचे समोर आले. सामान्य नागरिकांवर अत्यंत हिंसक मार्गाने झालेला थेट हल्ला आहे. न्यायालयात या हत्यारांना उभे केले पाहिजे, असे देखील कल्लोन यांनी म्हटले आहे.