बॉलिवूड स्टार्सनी कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राला मदत करावी…..

स्टार मंडळींकडील माणुसकी आणि सहानुभूती संपुष्टात 

पुणे :- संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातलेले असतांना महाराष्ट्राला मदतीचा हात देण्याऐवजी बॉलिवूड मधील स्टार मंडळी सुट्टी साजरी करण्यासाठी मालदीव मध्ये जाऊन मौज मजा करीत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

 

 

मार्च आणि एप्रिल या महिन्यात कोरोना च्या महाभयंकर लाटेने महाराष्ट्रात  थैमान घातले आहे. कोरोनाने अनेक बळी घेतले आहेत. कोरोना रुग्णांना रुग्णालयामध्ये बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, रेमदडेसीवीर इंजेक्शन मिळत नाहीत. अशा परिस्थितीत सरकार आपल्या परीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी मिळून या संकटाला सामोरे जाण्याची गरज आहे. विशेषतः ज्या बॉलिवूड मधील अनेक कलावंतांना महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी त्यांच्या सिनेमाची तिकिटे काढून त्यांचे सिनेमे पाहिले आणि ज्यांच्या जीवावर बॉलिवूड मधील मंडळी रातोरात स्टार झाली. पैसा, प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळवले. त्यांचे बंगले उभे राहिले, कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळविली. ऐश्वर्या राय, कपिल शर्मा, रोहित शेट्टी, करणं जोहर, सुभाष घई, दिपीका पदुकोण, रणवीर सिंह, यांच्यासोबतच  हृतिक रोशन, माधुरी दिक्षित, शिल्पा शेट्टी, कॅटरिना कैफ, श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, दिशा पाटणी, टायगर श्रॉफ, आलीया भट, रणबीर कपूर अशा अनेक कलावंतांना महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी सुपरस्टार बनवले. मात्र महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात असतांना त्यांना मदत करण्या ऐवजी ही स्टार मंडळी उन्हाळ्याची सुट्टी घालविण्यासाठी मालदीव मध्ये जाऊन मजा मारत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. 

 

 

बॉलिवूड मधील स्टार्सने ठरवले तर सरकारी हॉस्पिटल व कोरोना रुग्णांना करोडो रुपयांची आर्थिक मदत देऊन व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, रेमडीसीवीर इंजेक्शन व औषधे उपलब्ध होऊ शकतात. त्याचा फायदा गोर गरीब रुग्णांना होऊ शकतो. मात्र या स्टार मंडळी कडे अजिबात माणुसकी व सहानुभूती शिल्लक राहिलेली नाही, असे दिसते. अशी टीका बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. तसेच आपल्यात थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्राच्या मदतीला महाराष्ट्रातील बॉलिवूड मधील स्टार मंडळींनी मदतीला धावून यावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.