बीजिंगः
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नुकतेच जो बायडन विजयी झाले आहेत. पण जो बायडन यांचं अभिनंदन करायला चीनने नकार दिला आहे. निवडणुकीचे निकाल देशातील कायदे व कार्यपद्धतीनुसार लागायला हवेत, असे चीनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
3 नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडन आणि कमला हॅरिस यांच्या विजयाबद्दल चीनने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तिथल्या सरकारी माध्यमांनी त्यांच्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. पण चीनकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
यूएसमधील अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर चीनने काही निवेदन दिले आहे का ?,अशी विचारणा माध्यमांनी केली होती. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, “बायडन यांनी या निवडणुकीत विजय मिळवला असल्याचं आम्ही पाहिलंय.” “आमचा विश्वास आहे की, निवडणुकीचा निकाल अमेरिकन कायदा आणि कार्यपद्धतीनुसार निश्चित केला जाईल.”
मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली भूमिका स्पष्ट करेपर्यंत चीन निवेदन देईल की थांबेल, असे विचारले असता वांग म्हणाले, “आम्ही आंतरराष्ट्रीय परंपरा पाळू.” चीन, रशिया आणि मेक्सिकोसारख्या काही प्रमुख राष्ट्रांनी अमेरिकेचे अध्यक्ष झाल्याबद्दल बायडन यांचं अभिनंदन केलेले नाही असं हि यावेळी सांगण्यात आलं आहे.