मिरवणूक, मोर्चा, आंदोलने, निदर्शने, उपोषण करण्यास बंदी!

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आचारसंहितेच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, आंदोलने, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून हे आदेश देण्यात आले आहेत. वरील ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश २५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात म्हटले आहे.