मनोज जरांगे पाटील उमेदवार पाडण्याच्या वक्तव्यावर ठाम!
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा देण्याचा निर्णय सरकारने न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी ठराविक उमेदवार पाडण्याबाबत वक्तव्य केले. याचाच धसका सत्ताधारी व विरोधक घेत आहेत. त्याचमुळे आंतरवाली सराटीत दिग्गज नेत्यांची रिघ लागली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी मध्यरात्री २ वाजता जरांगे यांची भेट घेतली. सरकारच्या वतीने ते गेल्याचे सांगितले जाते. परंतु, पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर डॉ. सुजय विखे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सोशल मीडियावर मराठा समाजात तीव्र रोष व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीत हा रोष परवडणारा नसल्याने मंत्री विखेंकडून ही भेट घेतल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
लोकसभेतून धडा घेऊन आता प्रत्येक पक्ष व नेता सावध पावले टाकताना दिसतो. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा मुद्दा सोडवला गेला नसल्याने मनोज जरांगे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. उमेदवार उभे करायचे की पाडायचे यावर मराठा समाजाची आंतरवाली सराटीत गुरुवारी एक बैठक झाली. २० ऑक्टोबरला दुसरी बैठक होणार आहे. यावेळी निर्णायक भूमिका ठरवली जाणार आहे. पण लोकसभेपेक्षा विधानसभेत मराठा समजाची अधिक ताकद दिसणार असल्याचा विश्वास जरांगे पाटील यांना आहे. लोकसभेमध्ये बीड मतदारसंघात जे चित्र दिसले त्याची पुनरावृत्ती आपल्या मतदारसंघात दिसू नये, अशी धास्ती दिग्गजांना लागली. त्यामुळे जरांगे पाटील यांना भेटून नेत्यांकडून आपापली भूमिका सांगितली जात आहे.