दिल्लीगेट परिसरात पुन्हा सशस्त्र हाणामारी; तीन जखमी

किरकोळ वादातून हाणामारी, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

किरकोळ वादातून सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा, दिल्लीगेट परिसरातील नीलक्रांती चौकात असलेल्या पानटपरीवर घडली. या हाणामारीमध्ये तीनजन जखमी झाले. याप्रकरणी दोघांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत नीलक्रांती चौकात पोलिस पहारा लावण्यात आला होता. हर्षद अशोक भोसले (वय २६, रा. नीलक्रांती चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज साळवे (रा. सर्जेपुरा) व सनी काते (रा. सावेडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्र कश्यप साळवे सोबत कॅफे किंगसमोरील हनुमान पानटपरी समोर मावा घेत असताना, ‘बाजूला सरक’ असे म्हटल्याचा राग आल्याने दोघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याचे उद्देशाने धारदार शस्त्राने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सनी अनिल काते (वय २४, रा. सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, हर्षद अशोक भोसले, कश्यप साळवे (दोघे रा. निलक्रांती चौक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज हरिभाऊ साळवे (वय २४) याच्यासमवेत नीलक्रांती चौकात हनुमान पानटपरी  येथे पान खाण्यास गेले असताना, दोघांनी शिवीगाळ करुन दोघांवर धारदार वस्तूने छातीवर, पोटावर, दंडावर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यावर पुढील तपास पोलिस करत आहे.