नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागे भोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी
चितळे रोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने उपमहापौर भोसले यांना निवेद
शहरातील नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण व वाहनांची पार्किंग होत असल्याने जागे भोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी चितळे रोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमहापौर गणेश भोसले यांना दिले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय झिंजे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखील वारे, शकूर शेख, रामभाऊ धोत्रे, धनंजय देशमुख, अनुप काळे, श्रीनिवास बोज्जा आदी उपस्थित होते.
चितळे रोड येथील नेहरु मार्केट महापालिकेच्या वतीने दहा ते अकरा वर्षापूर्वी पाडण्यात आले. संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासन, अधिकारी व पदाधिकार्यांशी वेळोवेळी पाठपुरावा केला. उपोषण केले, आंदोलन केले, मात्र नेहरू मार्केट पुन्हा बांधण्याची कुणाची मानसिकता झाली नाही. उपमहापौर यांची नुकतेच महापालिकेच्या माध्यमातून नेहरु मार्केट बांधण्याचे स्पष्ट केल्याने संघटनेच्या सदस्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेत बर्याच जणांनी अतिक्रमण केलेले आहे. काही लोकांनी नेहरु मार्केटच्या पूर्वेच्या बाजूच्या जुन्या भिंतीवरच भिंत बांधून अतिक्रमण केले आहे. काही लोक दुचाकी व चारचाकी वाहने या जागेत कायमस्वरूपी लावत आहे. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील काही लोक नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागांचा वापर लघुशंका व कचरा कुंडी म्हणून करत आहे. तसेच घराच्या बांधकामाचे रॉ मटेरियल माती, दगड, विटा या जागेत आणून टाकल्या जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. यासाठी नेहरु मार्केटच्या मोकळ्या जागे भोवती संरक्षक भिंत बांधण्याची गरज असून ती त्वरीत बांधण्याची मागणी संघटनेने केली आहे.