धाराशिवचे जिल्हाधिकारी ओंबासे यांच्या नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्राची चौकशी होणार

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सचिवांना निर्देश : पूजा खेडकरनंतर दुसरे प्रकरणही तापले

धाराशिव येथील जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सादर केलेल्या नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्र शासनाच्या सचिवांना दिले आहेत. त्यामुळे ओम्बासे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर ओम्बासे यांचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी 11 नोव्हेंबर रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून लोकसेवा आयोगाचे आपण सचिव इंद्रजीत सिंग यांनी चौकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकारी ओम्बासे यांचे वडील प्राध्यापक असताना त्यांनी नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र कसे काढले? असा प्रश्न सुभेदार यांनी उपस्थित केला. ओम्बासे यांनी पाच वेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यापैकी चार वेळा खुल्या प्रवर्गातून तर पाचव्या वेळी ओबीसी प्र वर्गातून परीक्षा दिलेली आहे. ओम्बासे यांचे वडील वरिष्ठ प्राध्यापक असताना त्यांनी नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र काढलेच कसे? याशिवाय त्यांचे जवळचे नातेवाईक उच्च पदस्थ अधिकारी आहेत. मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असताना त्यांनी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप ही त्यांनी केलेला आहे.