डोंगरे संस्थेच्या वतीने शहरातील पत्रकार, वृत्त छायाचित्रकार व माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान
जिल्ह्यातील पत्रकारितेने सामाजिक चळवळीला बळ देण्याचे काम केले -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकार, वृत्त छायाचित्रकार व माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी पत्रकार संजय सावंत, वृत्त छायाचित्रकार वाजिद शेख, माध्यमांचे प्रतिनिधी अमोल भांबरकर, सुधाकर पवार, समर्थ गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, जिल्ह्यातील पत्रकारितेने सामाजिक चळवळीला बळ देण्याचे काम केले. सर्वसामान्य कार्यकर्त्याला सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळवून देण्याचे काम पत्रकार करत आहे. तर समाजाला दिशा देण्याबरोबरच सामाजिक जाणीव ठेवून पत्रकारितेचे व्रत जोपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना संजय सावंत यांनी पत्रकारिता क्षेत्रात झपाट्याने अमुलाग्र बदल घडत आहे. ऑनलाईन बातम्यांच्या ट्रेंडमध्ये वृत्तपत्र देखील टिकून आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचे काम जिल्ह्यातील पत्रकार बांधव करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे, भाजपचे बाळासाहेब भुजबळ आदी उपस्थित होते.