डॉ. दाभोलकर-पानसरे हत्येत सनातन संस्थेला गुंतवण्यामागे अंनिस आणि शहरी नक्षलवादी यांचे षड्यंत्र !
सनातन धर्म नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांकडून सातत्याने षड्यंत्रे चालू आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांचे षड्यंत्र होते, असे सनातन संस्थेचे श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे. ते सनातन संस्था आयोजित ‘अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद!’ यावर लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, पुणे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘असत्यमेव जयते’ या पुस्तकाचे लेखक श्री.अभिजित जोग यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी श्री.राजहंस पुढे म्हणाले की, डॉ.दाभोळकर आणि पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेला दोषी ठरवून ‘बळीचा बकरा’ बनवण्याचा प्रयत्न झाला. अर्बन नक्षलवादाशी जोडलेल्या डॉ.दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी, डाव्या विचारांच्या पत्रकार गौरी लंकेश या ४ हत्या झाल्यावर देशातील डाव्या विचारांच्या मान्यवरांनी ‘ॲवार्ड वापसी’ पासून ते भारतात रहाण्याची भीती वाटू लागल्याची ओरड चालू केली. महात्मा गांधींच्या हत्येनंतर देशात याच हत्या झाल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले; मात्र भारतात मागील २५ वर्षांत नक्षलवाद्यांनी १४ हजारांहून अधिक जवान, पोलीस, राजकीय नेते, सामान्य नागरिक यांच्या ज्या हत्या केलेल्या आहेत, देशभरात कमलेश तिवारी, किशन भरवाड, प्रवीण नेत्तारू, प्रशांत पुजारी यांच्यासारख्या हजारो हिंदुत्ववाद्यांच्या ज्या हत्या केल्या गेल्या, त्यांच्या संदर्भात कधीही चर्चा केली जात नाही, असे का? डॉ.दाभोलकर हत्येप्रकरणी न्यायालयाने हिंदु जनजागृती समितीचे डॉ.वीरेंद्रसिंह तावडे, सनातन संस्थेचे साधक श्री. विक्रम भावे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची निर्दाेष मुक्तता केली. डॉ.वीरेंद्रसिंह तावडे यांना या प्रकरणात ८ वर्षे कारागृहवास भोगावा लागला. हा त्यांच्यावरील अन्याय आहे. श्री.विक्रम भावे यांना २ वर्षे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ४२ दिवस कारागृहात रहावे लागले. या तिघांचे व्यक्तीगत हानी कोण भरून देणार? ‘विवेकाचा आवाज’ म्हणवणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती याविषयी जाहीर माफी मागणार आहे का? असा प्रश्नही श्री.राजहंस यांनी या वेळी उपस्थित केला.