अहिल्यानगर, शिर्डी : शुभेच्छांचा स्वीकार आणि चाहत्यांची फोटोसेशनची इच्छा पूर्ण करीत ते येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करीत होते. कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे प्रतिबिंब या गर्दीवर पाहायला मिळत होते. काल मतमोजणीच्या वेळी विविध मतदारसंघांत घडलेल्या घडामोडींची माहिती हे कार्यकर्ते त्यांना देत होते. चाहत्यांनी दिलेले पुष्पगुच्छ आणि शालींचा ढीग सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यकर्त्यांसमावेत संवाद साधताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, महायुतीवर विश्वास दाखवून जिल्ह्यातील मतदारांनी दहा विधानसभा मतदारसंघांत मोठे यश मिळून दिले. माझ्या वाढदिवसाची खूप मोठी आणि महत्त्वाची भेट आहे.
आता निवडणुका संपल्या असल्याने जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी महायुतीचे लोकप्रतिनिधी पुढाकार घेतील. आपण देखील या विकास प्रक्रियेत योगदान देणार आहोत. आज माझे अभीष्टचिंतन करण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांची गर्दी माझा उत्साह वाढविणारी आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीच्या लोककल्याणकारी योजनांवर शिक्कामोर्तब केले. निवडणुकीच्या काळात बाहेरच्यांनी येवून आमच्या विरोधात वक्तव्ये केली. मात्र जनता विकासाच्या बाजूने ठामपणे उभी राहिली.