संभाव्य तिसऱ्या लाटेतही अर्थचक्र सुरळीत राहील यासाठी प्रयत्न
जिल्ह्यातील उद्योग- व्यापारी संघटना प्रतिनिधींशी करणार चर्चा
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मात्र, या लाटेत जिल्ह्यातील अर्थचक्र सुरळीत सुरु राहील, त्यादृष्टीने कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करुन उद्योजक आणि व्यापारी असोसिएशन कशा प्रकारे उद्योग सुरु ठेवू शकतील, यासंदर्भात जिल्ह्याचा आराखडा तयार करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले.
याविषयी उद्योजक तसेच व्यापारी असोसिएशन यांच्याशी जिल्हापातळीवर बैठक आयोजित करण्यात येणार असून उपविभागीय पातळीवरही उपविभागीय अधिकाऱ्यांना अशा कोविड बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणांचा कोरोना उपाययोजना आणि सद्यस्थितीसंदर्भात आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राजूरकर, कोविड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालयातून तर तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी सहभागी झाले होते.