लवकरच नगर शहरात इलेक्ट्रिक बस धावणार !
पीएम ई- बस योजनेअंतर्गत नगर शहरासाठी केंद्र शासनाकडून 40 इलेक्ट्रिक बस मंजूर
अहमदनगर : केंद्र शासनाने मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग ॲण्ड अर्बन अफेअर्स मंत्रालयांतर्गत सुरू केलेल्या पीएम ई- बस सेवा योजनेंतर्गत नगर शहराला ९ मीटर लांबीच्या ४० इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. या बससाठी केडगाव येथे बस डेपो व चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिक बस शहरातून धावणार आहेत. सध्या शहरात खासगी ठेकेदारामार्फत मनपा बससेवा चालविण्यात येत आहे. शहरात एकूण १५ बस आहेत. मात्र, यातील बहुतांशी बस या जुनाट झाल्या आहेत. म्हणून सर्व बस शहरातील रस्त्यांवर धावत नाहीत, त्यामुळे नागरिकांना रिक्षाने प्रवास करावा लागतो. योग्य वेळेवर बस मिळत नाही, ठरलेल्या वेळेत बस पोहचत नाही. यावर उपाय हा, इलेक्ट्रिक बस आल्यानंतर त्या शहरातील १५ महामार्गावरून चालणार असून या सर्व अडचणींवर लवकरच मात करता येईल.
केडगाव येथील सर्व्हे नंबर २०६ याठिकाणी बस डेपों प्रस्तावित असून या कामासाठी मनपाच्या बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबविली आहे. या डेपोपर्यंत वीजवाहिनी टाकून देण्याची जबाबदारी महावितरणाची आहे. आता हे दोन्ही कामे तातडीने मार्गी लागली तरच केंद्राकडून इलेक्ट्रिक बस उपलब्ध होणार आहेत.
* चालकांच्या नियुक्तीचे कामही केंद्राकडेच:
* शहरात इलेक्ट्रिक बससेवा लागू झाल्यानंतर त्या चालविण्यासाठी केंद्र सरकारकडूनच चालकांची नियुक्ती केली जाणार आहे.
* या नियुक्तीमुळे शहरातील स्थानिकांना या माध्यमामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे.