प्रतिनिधी ( वैष्णवी घोडके )
ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी १५ हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंत्याला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात अटक केली. पांडू पुनाजी माळवी ( वय ३६ रा. शिवाजीनगर ), असे अटक केलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील लिंपनगाव येथील एका हॉटेल मध्ये ही कारवाई करण्यात आली. लिंपनगाव ग्रामपंचायतीचे विद्युत बिल थकल्याने महावितरण कंपनीकडून वीज जोड बंद करण्यात आली होती. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा बंद झाला होता.यातील तक्रारदार यांनी माळवी यांची भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्याबाबत विनंती केली होती. यासाठी माळवी याने २० हजार रुपयाची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. पथकाने मंगळवारी लिंपणगाव येथील हॉटेलमध्ये सापळा लावला होता. यावेळी माळवी यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारली. यावेळी माळवी याला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्यासह पोलीस निरीक्षक पुष्प निमसे, पोलीस हवालदार संतोष शिंदे, विजय गंगूल, रमेश चौधरी, अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड राधा खेमनर, संध्या म्हस्के यांच्या पथकाने कारवाई केली.