कॉ.आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रस्ताव होत असल्याने साहित्यिकांमध्ये चैतन्य

ऋषिकेश राऊत 

अहमदनगर (प्रतिनिधी)

 

कॉम्रेड शाहीर अण्णाभाऊ साठे आणि कॉम्रेड शाहीर अमर शेख यांचे स्वप्न असलेले ‘शाहीरी विद्यापीठ’ बोधेगावी होऊ शकले नाही तरी अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक “साहित्य रत्न भूमी” बोधेगाव, ता.शेवगाव, जि.अहमदनगर येथे उभारण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री ना.डॉ.विश्वजित कदम यांनी प्रस्ताव सादर करण्यास मान्यता दिल्याने जाहिर आभार मानण्यात येत असुन साहित्यिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे,असे मत शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी व्यक्त केले आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार आणि कांतिसिंह नाना पाटील , प्रबोधनकार के.सी.ठाकरे यांच्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढलेले कॉम्रेड शाहीर अण्णा भाऊ साठे आणि कॉम्रेड शाहीर अमर शेख यांचे पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत तसेच शेतकरी कामगार चळवळीत मोलाचे कार्य आहे.त्यामुळेच प्रगतिशील लेखक संघ,शब्दगंध साहित्यिक परिषद व विविध सामाजिक, साहित्यिक संस्थांनी कॉ.आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बोधेगावं येथे व्हावे अशी मागणी मागील दोनवर्षापासुन केली होती,त्यासाठी अनेक मान्यवर प्रयत्नशील होते,अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत कविवर्य आ.लहू कानडे साहेब विधानसभा सदस्य झाल्यावर वेळोवेळी यांचेशी या विषयावर साहित्यिक चर्चा करत.या सर्व गोष्टींची दखल घेऊन हे स्मारक होत असल्याने आनंद व्यक्त होत आहे.

१९४२ साली बंगाल प्रांतात भिषण दुष्काळ पडला होता. लाखो भुकबळी जात होते. त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रभर कार्यक्रमांची मालिका सादर करून मदतनिधी उभा करण्यासाठी मुंबईतील साम्यवादी विचाराच्या कलावंतांनी एकत्र येत ‘इंडियन पिपल्स थिएटर असोशिएशन’ ( इप्टा ) Indian People’s Theater Association ( IPTA ) या संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे अण्णा भाऊंनी ‘बंगालची हाक’ हा पोवाडा लिहला. दुष्काळग्रस्तांना मदत केली. तसेच १९४४ साली टिटवाळा येथील शेतकरी परिषदेत अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णा भाऊ यांनी ‘ लाल बावटा कलापथक’ स्थापन केले होते.

अण्णा भाऊंनी आपला पहिला गण आणि वग हा कम्युनिस्ट पार्टीच्या ‘कार्ड हेल्डर’ कॉम्रेड शंकर नारायण पगारे यांच्या प्रोत्साहन आणि सहकार्याने भाडेकरू संघाची असलेली खोली जी ‘लालबावटा खोली’ म्हणून मुंबईत प्रसिध्द होती तिथे लिहिला आणि परळ येथील दळवी बिल्डींगच्या गच्चीवर कॉ.गंगाधर अधिकारी, कॉ.बी.टी.रणदिवे, कॉ.पी.सी.जोशी यांच्या उपस्थितीत कॉ.शंकर पगारे आणि सहका-यांसह सादर केला होता.अण्णाभाऊंनी पोवाडे, लावण्या, गीते, कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटक, लोकनाट्य असे विविध साहित्यप्रकार हाताळले होते.वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी हे त्यांच्या साहित्याचे प्रमुख सुत्र होते.अण्णाभाऊ हे विशिष्ठ समाज, जात अथवा जमातीचे नसुन ते जगातील कष्टकरी, पिडीत आणि शोषितांचे प्रतिनिधी होते. त्यांनी त्यांचे प्रतिनिधीत्व निष्ठेने आणि मानाने केले होते.ते देशभरातील अनेक कलावंत, लेखक, शाहीर यांचे आदर्श आहेत. त्यांचे लिखाण म्हणजे कविमनाने अन्यायाविरूध्द नोंदविलेल्या प्रखर प्रतिक्रियाच होत्या मग तो अन्याय निसर्गाने मानवाविरूध्द केलेला असो अथवा एका माणसाने दुस-या मानसाविरूध्द केलेला असो. त्यांचे नायक-नायिका आपल्या हक्कासाठी, सन्मानासाठी निष्ठापुर्वक संघर्ष करताना दिसतात.अण्णाभाऊ हे बंद खोलीत लिखाण करणारे साहित्यिक नव्हते तर जनांदोलनात सक्रिय सहभागी झालेले कार्यकर्ते होते.

अहमदनगर जिल्हातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांच्या स्मृती जडलेल्या आहेत.येथेच ‘शाहीरी विद्यापीठ’ स्थापन करण्याचे स्वप्न या दोघांनीही पाहिलेले होते.अण्णाभाऊंच्या निधनानंतर मुंबईत त्यांचे अंत्यसंस्कार करून १ ऑगस्ट १९६९ रोजी त्यांच्या अस्थी बोधेगाव येथील शाहीरनगर येथाल जमिनीत शाहीर अमर शेख यांनी जतन करून ठेवल्याचा इतिहास आहे.म्हणून आम्ही प्रगतीशिल लेखक संघ व शब्दगंध साहित्यिक परिषद च्या वतीने स्मारक होण्याची मागणी केली होती.नुकतीच सामाजिक न्याय मंत्री ना.डॉ.विश्वजित कदम यांनी प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.

यासाठी विविध चळवळीतील कार्यकर्ते,कविवर्य आमदार लहू कानडे साहेब,बोधेगावं व शेवंगाव येथील काकडे परिवार,बोधेगावं चे ग्रामस्थ या सर्वांचे अभिनंदन करून आभार मानण्यात येते आहेत,कॉ.सुभाष लांडे,शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी, भगवान राऊत,सुभाष सोनवणे,प्रा डॉ अशोक कानडे,शाहिर वसंत डंबाळे,शाहिर डॉ.शेषराव पठाडे,प्रगतिशील लेखक संघाचे प्रा.डॉ.समाधान इंगळे,प्रा.स्मिता पानसरे यांच्यासह अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.