Entrepreneurs are the “Brand Ambassadors” of Maharashtra

मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी ‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ चा  पुढाकार

मुंबई :

महाराष्ट्रात काहीजण येत आहेत, पण त्यांना महाराष्ट्राची ‘मॅग्नेटिक’ ताकद काय आहे हे माहीत नाही. त्यामुळे इथले उद्योग त्यांच्याकडे जाणे दूरच राहिले. उलट त्यांच्याकडूनच आपल्याकडे उद्योग येतील. दुसरा कोणी पुढे जात असेल तर त्याबद्दल असुया नक्कीच नाही. स्पर्धा करा आणि पुढे जा! पण ओढूनताणून जर कोणी काही घेऊन जात असेल तर ते आम्ही नेऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बजावले.   ‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित उद्योजकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. मुख्यमंत्री ठाकरे  म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी ‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ पुढाकार घेत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्र हे एक वेगळे राज्य आहे. त्याला एक वेगळी संस्कृती आहे, संस्कार आहेत. त्यामुळे इथे  येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाहीत, असे सांगतानाच अन्य राज्यातील उद्योग महाराष्ट्रात येतील असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी ‘मिशन एंगेज’ ही पुस्तिका आणि ‘डिजिटल आर्ट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते.  महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येते आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे 113 वर्षे जुने साक्षीदार आहे. त्यामुळेच तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रँड अँबॅसिडर आहात. महाराष्ट्राच्या यशाची गाथा तुम्हीच इतरांना सांगू शकता. वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्रात उद्योग करूनही आम्हाला कोणतीही अडचण आलेली नाही. कोणतीही समस्या आली तरी सरकार नेहमी आमच्यासोबत असते, म्हणून आम्ही महाराष्ट्राला सोडू इच्छित नाही हे तुम्ही सांगायला हवे. यामुळे महाराष्ट्रात देशभरातून नव्हे परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळेल. यासाठी  महाराष्ट्राचे दूत होण्याचे  आवाहन उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना केले.

महाराष्ट्राचा विकास करताना केवळ मशीनच्या माध्यमातूनच विकास होईल असे नाही. तर गुंतवणूक अशी व्हायला हवी ज्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटायला हवा. त्यांच्या घरातील चूल पेटायला हवी. तेव्हाच उत्पादकांना चांगली बाजारपेठ आणि ग्राहक मिळू शकतील, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केल्या.  कृषी आणि आरोग्य क्षेत्रात उद्योगाच्या मोठया संधी निर्माण झाल्या असून इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्ससारख्या संस्थेने यात पुढाकार घेतल्यास शेतकऱयांनाही याचा फायदा होईल. जागतिक स्तरावर आरोग्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रातही मोठी संधी निर्माण झालीय . इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्सतर्फे सुरू करण्यात आलेले ‘एंगेज महाराष्ट्र’ हे अभियान नक्कीच  यशस्वी होईल. यासाठी लागणारे सहकार्य शासनामार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.