डिसेंबरमध्ये अनेक चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

वर्षाखेर प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी

 

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये अनेक चित्रपट आणि वेब सीरीज  वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहेत. वर्षाखेर प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे  ‘दरबान’ हा भावनिक कथानकावर आधारित चित्रपट 4 डिसेंबर रोजी ‘झी 5’वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शरिब हाश्मी, शरद केळकर, सालिका दुग्गल आणि फ्लोरी सैनी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय याच दिवशी ‘बॉम्बे रोज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

गीतांजली राव दिग्दर्शित हा चित्रपट अ‍ॅनिमेटेड आहे. या चित्रपटातील पात्रांना अनुराग कश्यप, सायली खेर आणि अमित डीयोंडी यांनी आवाज दिला आहे.11 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दोन मोठ्या सुपरस्टार्सचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अभिनेत्री भूमि पेडणेकर हिचा ‘दुर्गामती’ आणि संजय दत्तचा ‘टोरबाज’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपटांच्या कथा एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. ‘टोरबाज’ या चित्रपटामध्ये संजय दत्तसह नर्गिस फाखरी आणि राहुल देव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘थ्रिलर स्पाय लाहोर कॉन्फिडेंशिअल’ हा चित्रपट ‘झी 5’वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रिचा चड्ढा, करिश्मा तन्ना, खालिद सिद्दीकी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. याव्यतिरिक्त वरुण धवनचा ‘कुली नंबर 1’ 25 डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘कुली नंबर 1’ हा गोविंदाच्या ‘कुली नंबर 1’ चित्रपटाचा रिमेक आहे.  डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

‘सन्स ऑफ द सॉइज’ अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरीज कबड्डी खेळावर आधारित आहे. या मालिकेत अभिषेक बच्चनचा कबड्डी संघ जयपूर ‘पिंक पँथर्स’ चा प्रवास दाखविला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘भाग बिनी भाग’  या कॉमेडी वेब सीरीजमध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘स्टँड अप कॉमेडी’मध्ये करिअर करू इच्छित असलेल्या मुलीची ही कहाणी या वेब सीरीजमध्ये दाखवण्यात आली आहे.

याशिवाय ‘अ‍ॅक्शन ड्रामा’ प्रेमींसाठी 11 डिसेंबर रोजी ‘श्रीकांत बशीर’ ही वेब सीरीज सोनी लाइव्हवर प्रदर्शित  होणार आहे.  सलमान खानच्या टेलिव्हिजन कंपनीने ही वेब सीरीज तयार केली आहे. या मालिकेत पूजा गोरे, रोहित चौधरी, अमिश जग्गी हे कलाकार दिसणार आहेत. ‘ब्लॅक विडोज’ ही वेब सीरीज 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल. या क्राइम थ्रिलर वेब सीरीजमध्ये मोना सिंह, शमिता शेट्टी, स्वस्तिक मुखर्जी, रायमा सेन, शरद केळकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.