वैष्णवी घोडके
7.2 रिश्टर क्षमतेचा भूकंप हैती या कॅरेबियन देशात झाला. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी या भूकंपामुळे झाली. मीडिया रिपोर्टनुसार, या भूकंपात आतापर्यंत 724 लोकांचा मृत्यू झाला असून कमीत कमी 2800 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारतींची पडझड झाली आहे. संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले आहे. तसेच अनेकजण अद्यापही इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
हैतीमधील अनेक शहरे शनिवारी भूकंपामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. भूकंपामुळे उद्भवलेल्या भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडथळे येते आहेत. आधीपासूनच कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या हैतीतील नागरिकांच्या समस्या भूकंपामुळे आणखी वाढल्या आहेत.
राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून 125 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेक्षणाकडून सांगण्यात आले आहे. भुकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर काही सौम्य धक्केही जाणवले. त्यामुळे भीतीच्या सावटाखाली नागरिकांनी रात्र रस्त्यावरच काढली.
दुसरीकडे हैतीवरील संकट पुढच्या आठवड्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्रेस वादळ सोमवारी किंवा मंगळवारी हैतीच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युएसएड प्रशासक समांथा पॉवर यांची हैतीच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. युएसएड हैतीमधील नुकसानीचा आढावा घेऊन मदत करणार आहे. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली या देशांनीही मदतीची घोषणा केली आहे.
दरम्यान, हैतीमध्ये कोरोना संकट, राष्ट्रपतींची हत्या, अफाट गरीबी आणि भूकंप या लागोपाठच्या संकटांमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो नागरिक बेघर झाले आहेत. हैतीच्या सरकारने संपूर्ण देशात एक महिन्यासाठी आरोग्यसेवेचा आपातकाळ जाहीर केला आहे.