अफगाणिस्तानमध्ये नक्की काय घडलं?

तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण

वैष्णवी घोडके

तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवायला सुरुवात केली. यानंतर तालिबानने अखेर काबूलमध्ये प्रवेश केला. तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानवर जगाचं लक्ष आहे.

अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्य हटवल्याने हा वाद उफाळल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडन यांना जबाबदार धरत, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे. तालिबाने अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान‘ जाहीर केलं आहे.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा. 

 

 

 

 

अफगाणिस्तानातून पळाल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. देशातील रक्तपात रोखण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं असं अशरफ गनी म्हणाले. मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं, असंही त्यांनी म्हटलंय.

तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय. जो तो देश सोडण्यासाठी प्रयत्न करतोय. विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलंय.

 

 

 

 

दरम्यान, अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडत असताना आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक होत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे. राजधानी काबूलमधील विमानतळावर सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे. त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत.