राष्ट्रध्वज फडकविताच त्यांच्या डोळयात तरळले आनंदाश्रू !
वनकुट्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा बहुमान
अहमदनगर (वैष्णवी घोडके)
राष्ट्रध्वज फडकाविण्याचा बहुमान कोणाला नको असतो ? वनकुटे येथे मात्र लोकनियुक्त सरपंच अॅड. राहुल झावरे यांनी स्वतःचा हा बहुमान कोरोना काळात जिव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देत त्यांच्या कामाला सलाम केला ! मानधनावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना हा बहुमान आपणास मिळेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. सरपंच अॅड. झावरे यांनी त्यांना ही संधी दिली आणि ध्वज फडकविताच त्या कर्मचाऱ्यांच्या डोळयात आनंदाश्रू तरळले !
विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नेहमीच चर्चेत असलेले वनकुटे गावाचे लोकनियुक्त सरपंच अॅड. राहूल झावरे यांनी यंदा गावातील विविध ठिकाणच्या ध्वजारोहनाचा बहुमान आरोग्य कर्मचाऱ्यांना देऊन कोरोना काळात त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला आहे !
लोकनियुक्त सरपंच म्हणून कामकाजास सुरूवात केल्यानंतर अॅड. झावरे यांनी प्रत्येक वेळी समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना ध्वजारोहनाचा बहुमान देऊन त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेतली आहे. ध्वजारोहानाचा सरपंचाचा बहुमान समाजीक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींना देऊन अॅड. झावरे यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अतिशय घट्ट असल्याचे कृतीतून सिध्द केले आहे. यापूर्वी माजी सैनिक, गरीब परंतू समाजासाठी झटणाऱ्या नागरीकांना झावरे यांनी ध्वजारोहनाची संधी देत त्यांच्या कार्यास सलाम केला आहे.
गेल्या दिड वर्षांपासून कोरोनामुळे संपूर्ण जग हादरून गेलेले असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जिव धोक्यात घालून कोरोना बाधितांवर उपचार केले. बाधितांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्याचा संसर्ग झाला. मात्र जिवाची पर्वा न करता गेल्या दिड वर्षांपासून हे कर्मचारी आहोरात्र समाजाची सेवा करीत आहेत. त्यांनी केलेल्या या कामाचे मोल करणे शक्य नाही. तरीही स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहनाचा बहुमान या कर्मचाऱ्यांना देऊन त्यांच्या ॠणातून उतरण्याचा आम्ही ग्रामस्थ प्रयत्न करीत असल्याचे झावरे यांनी सांगितले.
वनकुटे गावाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर अॅड. झावरे यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. सरपंच वृक्ष दत्तक योजना राबवून खडकामध्ये वड, पिंपळाची झाडे लावण्यात येऊन त्याचे संगोपन करण्यात येत आहे. वाढदिवस, दशक्रिया विधी, विवाह आदींचे औचित्य साधून त्याच्या स्मृती जतन करण्यासाठी या वृक्षांचे रोपण करून त्याचे संवर्धन केले जाते. आतापर्यत या योजनेस अतिशय चांगला प्रतिसाद मिळला असून पर्यावरण संवर्धनाचे महत्वपूर्ण काम या उपक्रमाच्या माध्यमातून केले जात आहे.
प्राथमिक शाळेमध्ये भावी पिढी घडते. त्यामुळेे तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी तेथे भौतिक सुविधा परिपूर्ण असाव्यात यासाठी अॅड. झावरे यांच्या पुढाकारातून गावातील जिल्हा परीषदेची शाळा डिजीटल करण्यात आली. तेथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून तेथील विद्यार्थ्यांची प्रगतीही वाखानण्याजोगी आहे.
राज्यातील पहिला लसीकरण कॅम्प
कोरोना महामारीमुळे सर्वत्र भितीचे वातावरण असताना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर अॅड. झावरे यांनी गावामध्ये राज्यातील पहिला लसीकरणाचा कॅम्प आयोजित केला. विशेषतः या कॅम्पमध्ये आदीवासी बांधवांचे लसीकरण करण्यात येऊन समाजातील या वंचित घटकांना कोरोनापासून बाचावाचे कवच देण्याचेे महत्वपूर्ण काम अॅड. झावरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
या भागात अनेक आदीवासी बांधव आहेत. राज्य शासनाच्या अनेक योजना आ. नीलेश लंके यांच्या माध्यमातून राबविण्यात येऊन या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी अॅड. झावरे हे आहोरात्र झटत आहेत. आगामी तिन वर्षात आदीवासींच्या सर्व योजना वनकुटे व परिसरातील आदिवासी बांधवांसाठी राबविण्याचे ध्येय त्यांना उराशी बाळगले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्यांच्या गावाकडून, शाळेकडून काय आपेक्षा आहेत ? शिक्षण घेताना त्यांना काय अडचणी येतात ? त्यांचे त्रिस्त रीय पंचायत राज व्यवस्थेविषयी काय मत आहे ? गावच्या लोकप्रतिनिधीविषयी त्यांना काय वाटते ? हे जाणून घेण्यासाठी सरपंच अॅड. झावरे यांनी देशातील पहिल्या बाल ग्रामसभेचे अयोजन केले होते. या ग्रामसभेचा इतिवृत्तांत लिहिण्यात आला असून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या सुचनांची दखल घेत त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे !