नगर शहरामध्ये आज सर्व आरोग्य सेवा बंद!

अहमदनगर : कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) डॉक्टरांच्या संघटनांनी २४ तासांचा बंद पुकारला आहे. आज १७ ऑगस्ट सकाळी  सहा वाजल्या पासून उद्या १८ ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत हा बंद कायम राहील त्या मध्ये अतिदक्षता सेवा चालू असतील. या बंदच्या अनुषंगाने आज अहमदनगर शहरातील डॉक्टरांनी जॉगिंग ट्रॅक येथून पायी मोर्चास सुरुवात केली. त्यानंतर प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणी मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पुन्हा पायी मोर्चा तारकपूर, डीएसपी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार असून, कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप करण्यात आला. आरोपीला कडक शासन झाले पाहिजे तसेच अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी देखील सरकारच्या वतीने कडक कायदा करावा अशी मागणी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली आहे. 

महिला डॉक्टर खून प्रकरणी, संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यासाठी तेथील डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलकांवर हल्ला करण्यात आला. जेथे अत्याचार व खुनाची घटना घडली, त्या जागेसह रुग्णालयाची तोडफोड केली. इंडियन मेडिकल असोसिएशनने या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगर शाखेनेही शनिवारी सकाळी ६ ते रविवारी (१८ऑगस्ट) सकाळी ६ पर्यंत काम बंद आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे, असे नगर शाखेचे अध्यक्ष डॉ.चंद्रवदन मिश्रा आणि सचिव डॉ.मुकुंद तांदळे यांनी पत्रकात म्हटले आहे.