तपोवन रस्त्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडून पाहणी

संपत बारस्कर यांचे शिवसेनेवर टीकास्त्र 

अहमदनगर :
तपोवन रस्त्याच्या कामास नव्याने सुरुवात झाली आहे.  जोपर्यंत हा रस्ता दर्जेदार आणि मजबूत होत नाही तोपर्यंत आम्ही जनतेसाठी आंदोलन करत राहणार. ज्या राजकीय लोकांनी रस्त्यासाठी काहीही केले नाही. कुठला निधीही आणला नाही ते आज या रस्त्यावर निर्लज्जपणे फिरत आहे ही शरमेची बाब आहे, असे टिकास्त्र महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी शिवसेनेचे नाव न घेता सोडले.
तपोवन रस्त्याच्या कामाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी (दि.4) पाहणी केली यावेळी बारस्कर बोलत होते. याप्रसंगी बाळासाहेब पवार, डॉ. सागर बोरुडे, नितीन बारस्कर, निखिल वारे, योगेश ठुबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना बारस्कर म्हणाले, तपोवन रस्त्यासाठी अनेक वर्षापासून आ. संग्राम जगताप व आम्ही राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्व नगरसेवक हा रस्ता उत्कृष्ट दर्जाचा होण्यासाठी पाठपुरावा करुन शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करत होतो.
त्यासाठी अनेक आंदोलने केली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर काही ठिकाणी हा रस्ता खराब झाल्याने आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी संंबंधित अधिकार्‍याने पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम पुन्हा नव्याने सुरू करण्यात येईल असे पत्र दिले होते. आज हे काम नव्याने सुरू झाले असून हा रस्ता जोपर्यंत दर्जेदार होत नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यासाठी आंदोलन करत राहणार आम्ही केलेल्या पाठपुराव्याचे इतर कोणीही श्रेय घेऊ नये, असे बारस्कर म्हणालेत.