कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात तीन राम शिंदे व दोन रोहित पवारसह अकरा उमेदवार रिंगणात… बारा जणांची माघार
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात तीन राम शिंदे व दोन रोहित पवारसह अकरा उमेदवार रिंगणात… बारा जणांची माघार
——————————————————
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड – कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात छाननीअंती २३ उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बारा इच्छुकांनी माघार घेतली आहे. त्यामुळे अकरा उमेदवार रिंगणात असून यामध्ये दोन रोहित पवार व तीन राम शिंदे यांचा समावेश आहे. आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांना पक्षाचे चिन्ह मिळाले आहे. तर दोन रोहित पवार यांची निशाणी चित्र साधर्म्य असल्याने आ. रोहित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यामध्ये प्रामुख्याने अंबादास पिसाळ, अँड. कैलास शेवाळे यांचा समावेश आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी आशाबाई शिंदे, युनूस शेख, हनुमंत पावणे, आप्पा पालवे, पोपट शेटे, विकास मासाळ, अँड. कैलास शेवाळे, अंबादास उर्फ बप्पाजी पिसाळ, विकास राळेभात, रवींद्र कोठारी, स्वप्नील देसाई यांनी माघार घेतली.
यामध्ये प्रामुख्याने कॉंग्रेसचे अँड. कैलास शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक व भाजप नेते अंबादास पिसाळ, मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार विकास राळेभात व राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विकास मासाळ यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
या चारही उमेदवाराचा फायदा अनपेक्षितपणे राम शिंदे यांना होणार आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
दत्तात्रय सोनवणे बसपा, प्रा रामदास शंकर शिंदे, भाजपा,रोहित राजेंद्र पवार राष्ट्रवादी (शरद पवार गट), करण चव्हाण (आरपीआय), राम प्रभू शिंदे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, सोमनाथ भैलुमे वंचित,
राम नारायण शिंदे अपक्ष, रोहित चंद्रकांत पवार अपक्ष, शहाजी उबाळे अपक्ष, सतीश कोकरे अपक्ष,
हनुमंत निगुडे अपक्ष असे एकूण अकरा उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये प्रामुख्याने आ. राम शिंदे व आ. रोहीत पवार यांच्यात खरी लढत होणार आहे.
तीन राम शिंदे दोन रोहित पवार
————————-
विधानसभा निवडणुकीत राम शिंदे नाव अडनावाचे तीन उमेदवार आहेत या तिघांच्या निशाणी वेगवेगळ्या असल्या तरी नाव साधर्म्य एकच असल्याने त्याचा फटका आ. प्रा. राम शिंदे यांना कितपत बसेल याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत. तर आ. रोहित पवार यांचे नाव साधर्म्य तीन उमेदवार होते त्यापैकी एका रोहित पवार यांनी माघार घेतली त्यामुळे दोन रोहित पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी वाजवणारा माणूस व पिपाणी चिन्ह अपक्षा साठी होते याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर विजयी उमेदवाराचे मताधिक्य कमी करणे व एका उमेदवाराचा विजय हुकला होता. आता या निवडणुकीत आ. रोहित पवार यांना तुतारी वाजवणारा माणूस व दुसऱ्या रोहित पवार यास पिपाणी निशाणी मिळाले असल्याने याचा फटका आ. रोहित पवार यांना किती बसेल याची चर्चा होती.