लाडक्या बहिणी नंतर लखपती दीदी योजनेची अंमलबजावणी सुरू!

राज्य सरकरच्या वतीने महिलांना लाडकी बहिण योजनेची भेट दिली असतानाच आता केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरू केली. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महिलांना १ ते ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते. हे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी. त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. महिलेचे वय १८ ते ५० दरम्यान असावे. या योजनेसाठी अर्ज करणारी महिला उमेद अभियानच्या बचत गटाशी संबंधित असावी, तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती मार्फत राबवण्यात येते. या माध्यमातून ग्रामीण भागात महिला बचत गटांची निर्मिती करण्यात येते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये उमेद अभियान प्रभावीपणे काम सुरू आहे. असून जिल्ह्यामध्ये २८ हजार ५०० महिला स्वयंसहायता बचत गट तयार करण्यात आले. तीन लाखापेक्षा अधिक महिला या अभियानाशी जोडलेल्या आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना अभियान तसेच बँकांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.’ यासाठी आपण नजीकच्या पंचायत समिती कार्यालयातील उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्षास भेट द्यावी. महिलांना विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. यातून महिलांना रोजगार मिळणार आहे.