ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा निषेध
जशास तसे उत्तर देण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर नांदेड मध्ये झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत एक जातीय घराणेशाहीला आव्हान देणाऱ्यांवर अशा प्रकारे हिंसक व भ्याड हल्ले करुन त्यांना रोखण्याचा प्रयत्न होत असेल, तर वंचित बहुजन आघाडी हे कदापि सहन करणार नाही. या प्रवृत्तींना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे व सल्लागार जे.डी. शिरसाठ यांनी दिला आहे.
नांदेड जिल्ह्यात प्रचारासाठी दौऱ्यावर असताना हाके यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि एस.सी., एस.टी., ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. प्रस्थापित मराठा नेतृत्वाच्या घराणेशाहीच्या सत्तेला आव्हान निर्माण झाल्याने ओबीसी नेत्यांवर हल्ले केले जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपल्या हस्तकांच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.
असे हल्ले घडवून राज्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. वंचित बहुजन आघाडी ही दहशत बिलकुल खपून घेणार नाही. पुन्हा असे भ्याड हल्ले झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाणार आहे. तर हल्ल्यामागील मास्टर मार्इंड नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.