नगर-मनमाड रस्ता, पुढील आठवड्यात बैठक

खासदार निलेश लंकेने घेतली गडकरी यांची भेट

नगर जिल्ह्यातील बहुचर्चित नगर-मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या दुरुस्तीसंदर्भात खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. रखडलेल्या कामासंदर्भात गडकरी यांनी पुढील आठवड्यात रस्ते वाहतूक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावण्यात आल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले. नगर-मनमाड तसेच नगर-पाथर्डी या दोन्ही रस्त्यांची दुरावस्था झाल्याने त्यांची दुरुस्ती करण्याच्या मागणीला खासदार लंके यांनी मागील वर्षी उपोषण केले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे तत्कालीन नेते अजित पवार यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी नगर येथे शिष्टाई करत हे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. त्यावेळी पवार यांनी थेट नितीन गडकरी यांच्याशी संपर्क करून लंके यांनी आंदोलनात तोडगा काढला होता. गडकरी यांनी पवार यांच्यासह लंके यांच्याशी चर्चा करून विशेषतः नगर-पाथर्डी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची ग्वाही दिली होती. व हे काम लगेच सुरुही झाले होते. नगर-मनमाड रस्त्याचे हे काम सुरू झाले. मात्र ते पुन्हा थंडावल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याच मार्गाने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक जात असतात. या भाविकांनाही खराब त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही लंके यांनी गडकरी यांना यावेळी सांगितले. यावर गडकरी यांनी पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.